नेताजी सुभाषबाबू युवक मंडळाचे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अभिनंदन...
देशातील व राज्यातील वाढत जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता व कोवीड - १९ चा संसर्ग पसरु नये यासाठी महाराष्ट्र शासनाने नवरात्रौत्सव कशा प्रकारे साजरा करावा याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत. सदर परिपत्रकात अ.नं.७ वर नवरात्रौत्सवात गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा.रक्तदान, प्लाझ्मादान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ.आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे शासनाचे निर्देश आहेत.
त्या अनुषंगाने नंदुरबार शहरातील नेताजी सुभाषबाबू युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व सामाजिक जाणिवेचे भान ठेवून चालू वर्षी रावण दहनाचा कार्यक्रम रद्द करण्याचे व त्याऐवजी आरोग्यविषयक जनजागृती करण्याचे ठरविले आहे.
दि.०३.१०.२०२० रोजी नेताजी सुभाषबाबू युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.काशिनाथ मोहन चौधरी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.महेंद्र पंडित यांची भेट घेवून त्याबाबतचे लेखी विनंतीपत्र दिले.
नेताजी सुभाषबाबू युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी यांच्या उपरोक्त निर्णयाबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या या सामाजिक जाणीवेबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments