'शाळा बंद, पण शिक्षण सुरू'च्या तपासणीचे आदेश नंदुरबार जिल्ह्यात उपक्रम बंद असल्याच्या तक्रार; शिक्षण विभाग
जिल्ह्यातील शाळांमधील कोरोना काळातीलऑनलाइन शिक्षणाची परिस्थिती निमकी काय आहे, किती विद्यार्थ्यांपर्यंत 'शाळा बंद, पण शिक्षण सुरू' हा उपक्रम पोचविण्यात आला आहे, याची सद्यःस्थिती जाणून घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. | गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचा विकास गटातील केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाऱ्यांचे भरारी पथक तयार करून, शाळांना भेटी देऊन त्यांची तपासणी करून अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. कोरोना काळात विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची रुची, गोडी टिकून राहावी, यासाठी शिक्षण विभागाकडून नंदुरबार जिल्ह्यात 'शाळा बंद, पण शिक्षण सुरू' हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमानुसार बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यात काही शाळा गुगल मीट, झूम अॅप, तर काही शाळा इतर पद्धतीचा वापर करीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देत आहेत. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण, डोंगराळ दुर्गम भाग असल्यामुळे जिल्ह्यातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोणतेही
ऑनलाइन शिक्षण दिले जात नसल्याचे व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक तसेच कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांची विभागणी करीत किमान दहा शाळांमध्ये कोरोना काळात शिक्षण विभागाने निर्देशित केलेले उपक्रम राबविण्यात येत आहेत का, याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
तक्रारी अंती या बाबींची होणार तपासणी
टिलीमिली उपक्रम किती विद्यार्थ्यांपर्यंत पोचला?
एससीईआरटीच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम.
व्हॉट्सअप ग्रुपवर अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहे का?
शालेय अभ्यासक्रमांबरोबर पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची शाळांनी अंमलबजावणी केली का?
विविध अॅपचा उपयोग करून ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे का?
पाठ्यपुस्तकांचे वाटप करून विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येत आहे का?
फिजिकल डिस्टन्सचे पालन करून पालक सभा घेतल्या का? पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप केला का?
0 Comments