नंदुरबार मिशन बिगीन अगेन अंतर्गत आठवडे बाजार व वाचनालयास परवानगी

 नंदुरबार: मिशन बिगीन अगेन अंतर्गत आठवडे बाजार व वाचनालयास परवानगी

                आता सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहतील


जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड 

नंदुरबार  दि. 15: ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासकीय आणि खाजगी वाचनालये, स्थांनिक आठवडे बाजार आणि जनावराचे बाजार सुरु करण्यास परवानगी देण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी निर्देश दिले आहेत. या सर्व ठिकाणी कोविड-19 संदर्भात प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करणे आवश्यक राहणार आहे.

यापूर्वी मार्केट व दुकानांना सायंकाळी 7 पर्यंत परवानगी देण्यात आली होती. आता सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु राहतील. औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास अनुमती राहील. सर्व दुकाने व आस्थापनांनी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन आदी बंधने पाळणे आवश्यक आहे. करमणुकीसाठी बागा,उद्याने आणि सार्वजनिक खुल्या ठिकाणी एकत्र येण्यास तसेच बिझनेस टू बिझनेस विषयक प्रदर्शनासदेखील परवानगी देण्यात आली आहे.

सर्व शाळा, महाविद्यालये ,शैक्षणिक आणि कोचिंग संस्था बंद राहतील. ऑनलाईन, अंतराचे, दुरस्थ शिक्षणास परवानगी असेल. सर्व शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण तसेच दुरध्वनीद्वारे मार्गदर्शन आणि यासंबंधित सर्व कामकाज करण्यासाठी 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गास उपस्थित राहण्यास परवानगी राहील.

राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास अभियान किंवा भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांचेकडील नोंदणीकृत असलेले अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रे सुरू राहतील.

राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था, भारतीय उद्योजक संस्था आणि त्यांच्या प्रशिक्षण प्रदात्यांनादेखील परवानगी असेल. त्यांनी आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय यांचेकडील निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

उच्च शिक्षण संस्थामध्ये दुरस्थ शिक्षण हे प्राधान्य प्राप्त अध्यापनाचे साधन म्हणून सुरू राहील, त्याचबरोबर उच्च शिक्षण संस्थामध्ये  संशोधन अभ्यासकासाठी (पीएचडी) विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील पदव्यूत्तर विद्यार्थ्याना ज्या ठिकाणी प्रयोगशाळा, प्रायोगिक कामकाजासाठी संस्थाचे प्रमुख यांची खात्री पटल्यास परवानगी असेल.

राज्य विद्यापीठे, खाजगी विद्यापीठे आदी उच्च शिक्षण संस्थांच्या ठिकाणी केवळ संशोधन अभ्यासक (पीएचडी) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा, प्रायोगिक कामे यासाठी परवानगी असेल. 

इतर सूचना  यापूर्वीच्या आदेशाप्रमाणेच राहतील. सर्व आस्थापनांनी तसेच नागरीकांनी कोविड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वे ,आदेश तसेच सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. 

दिलेली मुभा प्रतिबंधीत क्षेत्र वगळता आहे. हे आदेश संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरीता लागू राहील. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments