नंदुरबार: पालिका ऊभारतेय खान्देशकन्या प्रतिभाताई पाटील, स्मिता पाटील यांच्यासह 10
राष्ट्रीय महिलांचे पुतळे...
नंदुरबार (वृत्तसेवा)- नंदुरबार नगरपरिषदेच्या पूर्णत्वास आलेल्या माँ बेटी उद्यानात 10 राष्ट्रीय आदर्श महिलांचे पुतळे उभारले जाणार असून त्यात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील या खान्देश कन्यांच्या पुतळ्यांचा देखील समावेश राहणार आहे.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, खास महिलांसाठी स्वतंत्र जिम नंदुबार नगरपरिषदेने उभारली तिचे काम पूर्ण झाले असून महिला लोकप्रतिनिधी व महिला अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांच्या हस्ते या जिमचे उद्घाटन करणार आहे. दसऱ्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळ दिल्यास त्यांच्या हस्ते नगरपरिषदेच्या नियोजित नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा सोहळा ऑनलाइन करण्याचा मनोदय आहे. तसे न झाल्यास लवकरच येथील स्तरावर भूमिपूजन करून इमारत उभारणीला प्रारंभ करण्यात येईल अशी माहिती देऊन रघुवंशी यांनी पुढे सांगितले की, नंदुरबार नगरपरिषदेने पंचवार्षिक निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकीच माँ बेटी गार्डन उभारणीचेही एक काम आहे. येत्या दोन महिन्यात ते पूर्ण होईल.
या उद्यानात माँ जिजाऊ, झाशीची राणी, राणी अहिल्याबाई होळकर, भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, मेरीकाँम, स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी, कल्पना चावला यांच्याबरोबरच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि अभिनेत्री स्मिता पाटील या दोन खानदेश कन्यांचा पुतळा उभारला जाणार आहे. नंदुरबार शहराला 24 तास पाणी देण्याच्या योजनेवर देखील वेगाने काम चालू असून पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशन संबंधित एनर्जी ऑडिट व प्रत्येक नळकनेक्शन धारका कडे जाऊन वॉटर ऑडिट सर्वे करणाऱ्या पथकाने सुरू केले आहे.
0 Comments