नंदुरबार: शहरातील गवळी समाज स्मशानभूमीत इतर समाजांकडून अनाधिकृतपणे मयतांवर होत असलेले अंत्यसंस्कार थांबविण्याबाबत वीरशैव लिंगायत गवळी समाज बांधवां तर्फे जिल्हाधिकारींना निवेदन

 नंदुरबार: शहरातील गवळी समाज स्मशानभूमीत इतर समाजांकडून अनाधिकृतपणे मयतांवर होत असलेले अंत्यसंस्कार थांबविण्याबाबत वीरशैव लिंगायत गवळी समाज बांधवां तर्फे  जिल्हाधिकारींना निवेदन देण्यात आले.

नंदुरबार विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे स्मशान भुमी बाबत जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांना निवेदन देताना गिरजाआप्पा हुच्चे, सोबत अशोक यादबोले, हेमंत नागापुरे, अॅड. सुशिल गोडळकर

महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशिय नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गवळी समाज संस्थेची स्वमालकीची सर्व्हे नं. २८६ पैकी क्षेत्र आर अनेक वर्षापासून स्मशानभूमी आहे. शहरातील वाघेश्वरी चौफुलीपासून हाकेचा अंतरावर पुला जवळ वळण रस्त्यावर स्मशानभूमी आहे. याठिकाणी पिंढ्यांपिढ्यांपासून गवळी समाजातील दिवंगत व्यक्तीस समाधीस्थ स्वरूपात अंत्यसंस्कार करण्यात येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून गवळी समाज स्मशानभूमीच्या जागेवर इतर समाजातील नागरीक अनाधिकृतपणे आपल्या कुटूंबातील मृतदेहांचे दफन विधी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार पहावयास मिळत आहे. परिणामी वाद वाढण्याची दाट शक्यता असून दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो. दोन दिवसांपूर्वीच इतर समाजातील नागरीकांनी गवळी समाजाची कुठलीही परवानगी न घेता एक मृतदेह दफन करण्याची विधी केली. सदर माहिती मिळताच गवळी समाज बांधव स्मशानभूमीत पोहोचल. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भविष्यात असा प्रकार पुन्हा घडु नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने संबंधीतांना समज देवून समुपदेशन करावे, अशी मागणी गवळी समाजामार्फत निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष गोपाल लगडे, कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे, गिरजु हुच्चे, अ‍ॅड. सुशिल गोडळकर, अशोक यादबोले, हेमंत नागापूरे, लक्ष्मण यादबोले, आनंदा घुगरे, ईश्वर घुगरे, देमाजी लगडे, यशपाल गवळी, किशोर काळेगवळी, किरण गठरी, संजय गवळी, राजा उदीकर, कन्हैया गवळी, यमाजी गवळी, महेंंद्र यादबोले, सुरेंद्र गवळी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

0 Comments