डॉ.राजेंद्र भारुड यांनी अरुण बोंगिरवार पुरस्कार जाहीर
ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापनात उत्तम कामगिरी...
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.5: राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांच्या नावाने ग्रामीण भागातील उत्तम सेवेसाठी दिला जाणारा ‘पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स ॲवॉर्ड’ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना जाहीर झाला आहे. राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भारतीय प्रशासकीय सेवेतील 307 अधिकाऱ्यांमधून डॉ.भारुड यांच्यासह इतर चार अधिकाऱ्यांची विविध क्षेत्रासाठी निवड केली आहे.
राज्याचे 25 वे मुख्य सचिव असलेल्या अरुण बोंगिरवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अरुण बोंगिरवार फाऊंडेशनची स्थापना केली. यशवंराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या सहाकार्याने आणि राज्य शासनाच्या सहमतीने त्यांच्या नावाने पुरस्काराची सुरूवात करण्यात आली. पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव व नामांकने मागविण्यात आली होती. निवड समितीत राज्याच्या मुख्य सचिवांसमवेत एचडीएफसीचे चेअरमन दिपक पारेख, जेएसडब्ल्यु फाऊंडेशनच्या संगीता जिंदाल, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर आणि यशदाचे महासंचालक आनंद लिमये यांचा समावेश होता.
डॉ.भारुड यांनी सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना कमी खर्चात सांडपाणी व्यवस्थापनाचा यशस्वी कार्यक्रम राबविला होता. अत्यंत कमी खर्चात होणारे आणि तेवढेच उपयुक्त शोषखड्याचे मॉडेल विकसीत करण्यात आले होते. या ‘सोलापूर मॉडेल’चे राज्यस्तरावर कौतुक झाले होते. त्यांच्या याच कामगिरीबद्दल त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
अरुण बोंगिरवार फाऊंडेशनतर्फे दरवर्षी 1 लाख रुपयांचा हा पुरस्कार देण्यात येतो. प्रशासनात काम करताना जनतेच्या कल्याणासाठी कल्पक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय वनसेवा आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार वितरण कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त उपक्रमांचे सादरीकरण करण्यात येते.
नंदुरबार जिल्ह्याला यावर्षीचा पुरस्कारचा हा मान मिळाला आहे. डॉ.भारुड यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. जाहीर झालेला पुरस्कार हा सोलापूर आणि नंदुरबार दोन्ही जिल्ह्यांना मिळालेला पुरस्कार असून प्रशासनातील आदर्श व्यक्तींच्या नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे नंदुरबारमध्ये आणखी अधिक चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी भारुड यांनी व्यक्त केला आहे
0 Comments