कमला नेहरू कन्या महाविद्यालयातर्फे ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरू’ उपक्रम
नंदुरबार-कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थीनींचे शैक्षणिक नुकसान होवू नये, यासाठी येथील प.खां.भगिनी सेवा मंडळ, धुळे संचलित कमला नेहरु कन्या कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरु’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना गृहभेट देवून शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर कोरोनाविषयी प्रबोधन केले जात आहे.
कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे गेल्या सात महिन्यापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद आहेत. अशावेळी सर्वत्र ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. परंतु ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थीनींना ऑनलाईन शिक्षण घेणे जिकरीचे झाले आहेत. तसेच ग्रामीण भागात मोबाइलला रेंग नसल्याने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून कमला नेहरु कन्या कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘शाळा बंद, पण शिक्षण सुरु’ हा उपक्रम ग्रामीण भागात राबविण्यात येत आहे.
नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव, बिलाडी, बारीपाडा, नारायणपूर, पापनेर, करणखेडा, सुंदरदे, उमर्दे बु, राकसवाडे, घुली, पळाशी, लोणखेडा, अडची या गावांना जावून प्राध्यापकांनी गृहभेट दिली. यावेळी विद्यार्थीनींना अभ्यासक्रमासह त्यांच्या पालकांना कोरोनाबाबत प्रबोधन केले व मास्क वाटत करण्यात आले. कोरोना आजाराच्या संसर्गापासून वाचण्यासाठी वारंवार साबणाने हात धुणे, सानिटायझरचा वापर करणे, तोंडाला मास्क लावणे आदींबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा.सरदार पावरा, प्रा.दिनेश पाटील, प्रा.दिनेश सूर्यवंशी, प्रा.वैभव चव्हाण, प्रा.रोहीत पटेल आदी परिश्रम घेत आहेत. तर संस्थेचे अध्यक्ष अतुलजी अजमेरा, सचिव सौ.स्मिता अजमेरा, प्राचार्या व्ही.पी.वाघमारे, उपप्राचार्य के.व्ही.पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
0 Comments