परवानगी पत्र नसल्यामुळे संभ्रम बुधवारी बॅन्ड व्यावसायिकांचे वाद्य वाजवुन आंदोलन
नंदुरबार (प्रतिनिधी) दिवाळी पासून सुरु होणाऱ्या लग्न समारंभानिमित्त बँड व्यावसायिकांना शासन नियमाप्रमाणे वाद्य वाजविण्यासाठी परवानगीचे लेखी पत्र नसल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. मात्र लेखी पत्र न मिळाल्यास बुधवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व बँड व्यवसायिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाद्य वाजवुन निदर्शने करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले. नंदुरबार जिल्हा बँड व्यवसायिक युनियनचे अध्यक्ष सुनिल पवार आणि पदाधिकाऱ्यांनी आज दि. २ नोव्हेंबर रोजी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे आणि उपजिल्हाधिकारी काकडे यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोना पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील बँड व्यवसाय ठप्प झाल्यामुळे शेकडो कामगार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिस्थितीत सुधारणा होऊन शासन नियमाप्रमाणे यंदाच्या दिवाळीनंतर हंगामात सशर्त परवानगी मिळावी यासाठी संघटनेमार्फत दिनांक १६ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड साहेब यांनी बँड वाजंत्री व्यावसायिकांना परवानगी देणार असल्याचे आश्वासन देऊन बुकिंग सुरू करण्याचे सांगितले होते.
त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बँड व्यावसायिकांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर व त्यानंतरच्या कालावधीतील लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांची नोंदणी करण्यास सुरुवात केली होती. आठवड्या भरावर दिवाळी असून त्यानंतर तुलसीविवाह पासून लग्नसमारंभ सुरू होणार आहेत. शासना तर्फे नुकताच जिम आणि व्यायाम शाळा सुरू करण्याबाबत आदेश काढण्यात आला . याप्रमाणे एसटी बसेस, व बाजारपेठ देखील पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. लवकरच लग्न समारंभ सुरू होणार असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करीत सर्व बँड व्यवसायिक वाद्य वाजविण्यास तयार आहेत. मात्र याबाबत जिल्हा प्रशासनाकडून लेखी पत्र नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी पुन्हा एकदा भेट घेऊन व्यथा मांडण्यात आली. लेखी पत्र नसल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कृपया प्रशासना तर्फे लेखी पत्र मिळण्याची मागणी करण्यात आली. मात्र लेखी पत्र न मिळाल्यास बुधवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व बँड व्यवसायिक, कामगार वाजंत्रीसह जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करतील. असा इशारा नंदुरबार जिल्हा बँड युनियनने निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनिल पवार शहराध्यक्ष सागर सोनवणे अमित डांमरे तालुकाध्यक्ष परमेश वसावे किशोर वळवी कौसर शेख अनिल वसावे आदी उपस्थित होते. दरम्यान नंदुरबार जिल्हा बँड युनियन नोंदणीकृत महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटना पुणे संचलित संघटना आहे. मात्र इतर काही बनावट कागदपत्रे देऊन दिशाभूल करणारे व्यक्ती बद्दल प्रशासनास माहिती देणार असल्याचे सुनिल पवार यांनी सांगितले.
0 Comments